'डी ' करव्हान्स सिंड्रोम (HAZARDS OF TEXT TYPING)

'डी ' करव्हान्स सिंड्रोम (HAZARDS OF TEXT TYPING)


'डी ' करव्हान्स किंवा कार्पल टनल सिंड्रोम हे काही नवीन आजार नाहीत. मनगटाचा व अंगठ्याचा अतिवापर करणाऱ्यांमध्ये असे आजार जास्त प्रमाणात दिसून येतात. संगणक आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे हा त्रास असणाऱ्या रुग्णांच्या संख्येत बरीच वाढ झालेली आहे. वयोमर्यादा पूर्वी ३० ते ५० वर्ष होती. लहान वयातच संगणक आणि मोबाईलचा अतिवापर अयोग्य पद्धतीने केल्यामुळे वयोमर्यादा १४ ते ५० वर्षे अशी झाली आहे. 
'डी ' करव्हान्स सिंड्रोम पुरुषांपेक्षा महिलांमध्ये १० पट जास्त आढळून येतो.

IT/BPO मध्ये काम करणाऱ्या तरुण पिढीस ८ ते १० तास संगणकासमोर बसून काम करावे लागते. शासकीय,निमशासकीय कर्मचाऱ्यांचीही तिच अवस्था आहे.सतत मोबाईलवर गेम खेळणारी लहान मुले,शाळा-कॉलेज,युवक -युवतींमध्ये  होणार मोबाईलचा अतिवापर,सतत SMS/TEXT TYPING केल्यामुळे मनगट व अंगठ्यावर निर्माण होणारा दाब या त्रासाचे मुख्य कारण आहे.घरकाम करणाऱ्या महिला,खेळाडू,मनगटावर ताण देऊन काम करणारे कामगार (सुतार,प्लंबर,इलेक्ट्रीशियन,मोटार मेकॅनिक)अतिलिखान काम करणारे लिपिक यांच्यातही या रोगाचे प्रमाण अधिक आढळून येते.

'डी ' करव्हान्स सिंड्रोम नाव जरी गुंतागुंतीचे वाटत असले तरी आजार गुंतागुंतीचा नाही. पण वेळेत उपचार न केल्यास ऑपरेशन करावे लागू शकते. ते टाळण्यासाठी 'डी ' करव्हान्स म्हणजे नक्की काय ते आपण समजून घेऊ. कारण कळले की परिणाम नक्की घालवता येतो.

'डी ' करव्हान्स सिंड्रोम 

मनगटाच्या अंगठ्याकडील बाजूस अंगठ्याच्या मुळात (Base)मनगटाची आणि अंगठ्याची हालचाल केल्यावर कळा मारणे,सूज येणे या आजारास 'डी ' करव्हान्स सिंड्रोम असे म्हणतात .


वरील फोटोत दाखवलेले दोन टेंडन (Conjoined Tendon),अँबडक्टर पॉलिशिअस लॉगस (APL)/एक्ट्न्सर पॉलिशिअस ब्रेव्हिस (EPB) मनगटाच्या अंगठ्याकडील बाजूने (Radial Styloid) अंगठ्याकडे जात असतांना एकाच आवरणातून अथवा टनल मधून जातात . (Fluid Filled Tendon Sheath) मनगटाच्या अतिवापरामुळे हे आवरण (Tendon Sheath) जखमी होते.आवरणाला सूज येते (Inflamation)आवरणाने बनलेला बोगदा अरुंद होतो (Stenosis) परिणामी वरील दोन्ही स्नायूंच्या (APL/EPB)हालचालीस अडथळा निर्माण होतो. परिणामी मनगटाच्या अंगठ्याकडील बाजूस अंगठ्याच्या मुळात कळ मारते,सुज देखील येते-(Stenosing Tenosynovitis). 
(टिप -टेंडन म्हणजे मांसपेशीस (Muscle) हाडाला जोडणारा दोरासारखा भाग )

लक्षणे :-

  • मनगटाच्या अंगठ्याकडील बाजूस अंगठ्याच्या मुळात कळ मारणे,सूज येणे. 
  • एखादी वस्तू घट्ट पकडतांना कळ मारणे. 
  • मुठ घट्ट आवळतांना कळ मारणे. 
  • टायपिंग करतांना,लिहितांना,कपडे पिळताना कळीचे प्रमाण वाढणे. 
  • अंगठ्याच्या हालचालींवर मर्यादा येणे. 

कारणे :-

    • मनगटाचा आणि अंगठ्याचा अतिवापर 
    उदा :-
      • संगणक व्यावसायिक
      • मोबाईल अतिवापर-- SMS (एस एम एस),टेक्स्ट टायपिंग, गेम खेळणे 
      • अति लिखाण काम करणारे लिपिक
      • घरकाम करणाऱ्यांमध्ये --कपडे पिळणे ,झाडू मारणे. 
      • इतर व्यवसाय ज्यात मनगटाचा अतिवापर होतो. उदा - इलेक्ट्रीशियन,मेकॅनिक,खेळाडू इ.
      इतर कारणे :-
        • मनगटाच्या इजा होणे,जखम होणे,जखमेची खून तयार होणे परिणामी मनगटाच्या हालचालींवर मर्यादा येते. 
        • संधिवात 
        • गरोदरपणा--गरोदरपणामध्ये काही महिलांना 'डी ' करव्हान्सचा त्रास होतो. 
        निदान :-
        १) फिंकलस्टाईन टेस्ट (Finkelstein Test)):- 
         बंद मुठीत अंगठा पकडून मूठ खालच्या दिशेने वाकवल्यास कळीचे प्रमाण वाढते. 



        २) अंगठ्याच्या मुळात,मनगटाच्या अंगठ्याकडील बाजूस दाबल्यास कळ मारते . ही कळ अंगठ्याच्या दिशेने आणि मनगटाच्या कोपराच्या दिशेने सुद्धा जाणवते. 

        तपासण्या :-
        एक्सरे आणि रक्ताची तपासणी डॉक्टरांनी सुचवल्यास कराव्यात. उदा संधिवाताच्या तपासण्या व युरिक ऍसिड तपासणी . 

        उपचार :-
        १. शस्रक्रिया विरहित
        २. शस्रक्रिया  
        ३. प्रतिबंधात्मक इलाज 

        १. शस्रक्रिया विरहित :-
        अ ) डॉक्टरांच्या सल्ल्याने सूज व दुखणे कमी करणारी औषधे घ्यावीत.सोबत टेंडिनायटिस कमी करणाऱ्या गोळ्याही घ्याव्यात. 
        ब )  मनगटाचा व अंगठ्याचा अतिवापर टाळावा.तेल किंवा मलम लावून हलका मसाज करावा. कोमट पाण्याने अथवा बर्फाने शेकावे. 
        क ) अंगठा व मनगट यांस स्पिलिंट लावून पंधरा दिवस विश्रांती घ्यावी.

        ड ) 'डी ' करव्हान्सच्या जागेवर सूज कमी करण्यासाठी स्टिरॉइड इंजेक्शन गरज पडल्यास अस्थिरोग तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावे. वारंवार इंजेक्शन टाळावे .
         
        २. शस्रक्रिया :-
        अगदीच काम करणे शक्य होत नसल्यास काही रुग्णांमध्ये स्नायूचे आवरण ऑपरेशन करुन मोकळे करावे लागते.
        ३. प्रतिबंधात्मक इलाज :-
        कारणावर इलाज केल्यास परिणाम नक्की घालवता येतो (Treat the Cause). मनगटाचा व अंगठ्याचा 
        अतिवापर हे कारण आहे.आणि  'डी ' करव्हान्स हा त्याचा परिणाम. मनगटाचा व अंगठ्याचा अतिवापर टाळल्यास आणि नियमित व्यायाम केल्यास 'डी ' करव्हान्सपासून काम करणाऱ्या हाताचे (Dominant Hand) संरक्षण करता येते.

        व्यायाम :-
        अ ) १) ज्या बाजूस 'डी ' करव्हान्स झाला आहे तो हात मनगटातून दुसऱ्या हाताच्या मदतीने वाकवा. चित्रात दाखवल्याप्रमाणे त्याच अवस्थेत ३० सेकंद ठेवा.
              २) हात मनगटातून वरच्या बाजूला खेचा दुसऱ्या हाताच्या मदतीने चित्रात दाखवल्याप्रमाणे त्याच अवस्थेत ३० सेकंद ठेवा.
        ३) असे एका वेळेस ३ दा करा व किमान १० वेळेस करा.(Do 3 sets of 10)

        ब ) १)मऊ स्पंजबॉल अथवा रबरी बॉल मुठीत आवळून धरा ५ सेकंद सैल सोडा
              २)असे दोन वेळेस  १५ वेळा करा.(Do 2 sets of 15)
        क)  १) बोट आणि अंगठ्याच्या बाजूने रबर बँड लावून ताण द्या आणि सैल सोडा. चित्रात दाखवल्याप्रमाणे १५ वेळा करा.(Do 2 sets of 15)
               २) असे दोन वेळेस  १५ वेळा करा.(Do 2 sets of 15)
        ड )  'डी ' करव्हान्स झालेला हात टेबलावर उभा ठेवा. अंगठ्याने प्रत्येक बोटास ६ सेकंद स्पर्श करा.असे १० वेळेस करा.
        इ ) पाण्याने भरलेली बॉटल चित्रात दाखवल्याप्रमाणे हातात पकडा. हात खांद्याच्या दिशेने उचला. १० सेकंद त्याच अवस्थेत ठेवा.असे १० वेळेस करा.
        ई ) पाण्याने भरलेली बॉटल चित्रात दाखवल्याप्रमाणे हातात पकडा--चित्रात दाखवल्याप्रमाणे मनगटाचे व्यायाम करा. असे तीन वेळेस  १५ वेळेस  करा.(Do 3 sets of 15)
        संगणक आणि मोबाईल या वापरास पर्याय नसला तरी योग्य पद्धतीने वापर करुन नियमित विश्रांती आणि व्यायाम करणे हे आपल्या हातात आहे.

        Prevention is Better than Cure.

        अडचणी निर्माण होण्याआधी टाळलेल्या बऱ्या!













        डॉ.संजय कामत 
        अस्थिरोगतज्ञ 
        प्रमुख कामत हॉस्पिटल ,पुणे. 
        ९८२२४३७८८२/७२७६७२२२२९







        Comments

        1. खूपच उपयुक्त माहिती

          ReplyDelete
        2. Excellent information , very helpful for both professional as well as common people . Thanks a lot .

          ReplyDelete
        3. Thanks for information.
          Very helpful for all the people.

          ReplyDelete
        4. अतिशय उपयुक्त माहिती मिळाली सर
          मनापासून धन्यवाद

          ReplyDelete

        Post a Comment

        Popular posts from this blog

        कोपरदुखी/टेनिस एल्बो/गोल्फर्स एल्बो

        VitB12 / B6 / फॉलिक ऍसिड गुणकारी जीवनसत्त्व

        Vit D 'ड' जीवनसत्व गुणकारी जीवनसत्व