कार्पल टनल सिंड्रोम (Hazard of Text Typing)

कार्पल टनल सिंड्रोम (Hazard of Text Typing)


लाईफ स्टाईल डिसऑर्डर्स किंवा आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण झालेल्या आजारापैकी कार्पल टनल सिंड्रोम हा अतिशय वेगाने वाढत चाललेला आजार आहे. वयोमर्यादा पूर्वी ३० ते ४० वर्ष वयोगट होता. आज तो १५ ते ४० वयोगटापर्यंत आला आहे. संगणक आणि मोबाईल फोनचा वापर हे त्या मागचे प्रमुख कारण आहे. 

माहिती तंत्रज्ञान युगामुळे भरपुर पैसा आणि रोजगार निर्माण झाले आहेत. IT/BPO मध्ये पैसा चांगला मिळत असला तरी तरुण पिढीस मात्र तो कमवण्यासाठी ८ ते १२ तास सलग संगणकासमोर बसून दिवस -रात्री काम करावे लागते. सतत टायपिंग केल्यामुळे ,सतत मोबाईलचा वापर,SMS,Text टायपिंग केल्यामुळे अंगठा व मनगटावर प्रचंड दबाव (प्रेशर) निर्माण होतो. त्याचा परिणाम हातामध्ये / बोटांमध्ये अचानक बधिरपणा येणे, मुंग्या येणे,कळ मारणे,भडका मारणे, पिन टोचल्यासारखे होणे,ताकद कमी होणे असा होतो. कॉम्प्युटर किबोर्ड टायपिंग ,मोबाईल टेक्स्ट टायपिंगमुळे असा त्रास असणारे एका महिन्यात किमान तीन ते चार रुग्ण तक्रार घेऊन येतात. महिलांचे प्रमाण अधिक आहे ,कारण त्यांचा कार्पल टनल पुरुषांच्या कार्पल टनलपेक्षा खूपच लहान असतो (पुरुषांपेक्षा जवळपास १/३ इतका लहान ).कार्पल टनल सिंड्रोममुळे रुग्णाचा काम करण्याचा हात कायमचा निकामी होऊ शकतो. ऑपरेशन करायची वेळ येऊ शकते . हि वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून कार्पल टनल सिंड्रोमबद्दल अधिक जाणून घ्या. कारण कळले की परिणाम नक्की घालवता येतो. 

कार्पल टनल सिंड्रोम (C.T.S) :- म्हणजे मनगटामार्गे -- तळहात व पंजातून बोटापर्यंत जाणाऱ्या मेडियन नर्व्ह (शिर) वर दाब आल्यामुळे तळहात व अंगठ्याच्या बाजूतील साडे तीन (३ - १/२) बोटांमध्ये बधिरपणा येणे(Numbness Parasthesia), मुंग्या येणे (Tingling),कळा मारणे(Pain),
भडका उठल्यासारखे  वाटणे (Burning),पिना टोचल्यासारखे वाटणे,हात नसल्यासारखे वाटणे यास  कार्पल टनल सिंड्रोम म्हणतात. 


कार्पल टनल (बोगदा) :-

मनगटात छोटी-छोटी हाडे असतात, त्यास कार्पल बोन म्हणतात. आडव्या ट्रान्सव्हर्स कार्पल लिगामेंट व कार्पल बोनच्या साहाय्याने निर्माण झालेल्या बोगद्यास कार्पल टनल असे म्हणतात.  मेडियन नर्व्ह (शिर),रक्तवाहिनी बरोबर हातातून तळहातात याच टनलमधून जाते. तळहातातून (Thenar Eminence) नंतर अंगठ्याच्या बाजूच्या तीन आणि चौथे अर्धे बोट यांच्यापर्यंत जाते. तळहाताच्या उंचवटयाचा भाग (Thenar Eminence) अंगठा ,त्याच्या बाजूचे बोट,मधले बोट आणि त्याच्या बाजूचे अर्धे बोट यांच्या संवेदना मेडियन नर्व्हवर अवलंबून असतात.   


कार्पल टनल सिंड्रोमची लक्षणे :-

तळहात (Thenar Eminence) व अंगठ्याच्या बाजूतील साडे तीन (३-१/२) बोटात 




  • बधिरपणा 
  • मुंग्या येणे 
  • कळा मारणे 
  • भडका मारणे 
  • पिन टोचल्यासारखे होणे 
  • ताकद कमी होणे 
  • तळहात वाळल्यासारखा दिसून निकामी होणे. 

➤मुख्य त्रास सुरु होण्याआधी महिनाभर हलकासा बधिरपणा (Parasthesia)बोटांमध्ये येतो. त्यानंतर अचानक रुग्णास मध्यरात्री झोपेतून कळा,मुंग्या,बोटांमध्ये बधिरपणा,बर्निंग सेंनसेशन,पिना टोचल्यासारखे वाटल्यामुळे जाग येते.(Nocturnal Onset) रुग्ण हात वारंवार झटकतो.हात हातावर घासतो,काही काळ त्यास हात नसल्याची भावना होते,बोटांवर सूज आली नसतांना सूज आल्यासारखे वाटते. काही वेळाने तो त्रास कमी होतो. काही रुग्णांमध्ये हा त्रास दिवसासुद्धा खूप टायपिंग किंवा लिखाण काम केल्यानंतर होतो. 

कार्पल टनल सिंड्रोम यास INSIDIOUS DISEASE असेही म्हणतात. कारण तो हळूहळू वाढतो आणि हानिकारक परिणामांमध्ये रुपांतरीत होतो. म्हणजे सुरवातीच्या काळात बधिरपणा येणे. मुंग्या येणे,
नंतर हळूहळू कळा मारणे,भडका उठल्यासारखे  वाटणे,कालांतराने आराम वाटणे ,परत पुन्हा पुन्हा तसाच त्रास हळूहळू होणे,बधिरपणा,मुंग्या येणे,कळा येणे,भडका मारल्यासारखे वाटणे असा वारंवार त्रास मेडियन नर्व्हवरील दाबामुळे होतो. वेळेत उपचार न घेतल्यास ती नर्व्ह (नस ) काम करणे बंद करते.परिणामी तळहात (Thenar Eminence) आणि अंगठ्याच्या बाजूतील साडे तीन (३-१/२) बोटातील ताकद गेल्यामुळे कामाचा हात निकामी होतो. 

➤मानदुखीमध्ये किंवा मानेच्या मणक्यातील चकती सरकल्यानंतर (PID)सुद्धा हातात मुंग्या येणे,कळा येणे असा त्रास होतो. पण या त्रासात मध्यरात्री रुग्ण त्रासामुळे जागा होत नाही (Nocturnal Onset). 
➤मनगटातील हाड मोडल्यामुळे किंवा सरकल्यामुळे किंवा मेडियन नर्व्ह मधील रक्तस्त्रावामुळे अचानक तीव्र स्वरूपाचा त्रास काही रुग्णांमध्ये होतो. 

➤रक्तातील संधिवातामुळे किंवा "गाऊट" संधिवातामध्ये सुद्धा असा कार्पल टनल सिंड्रोमचा त्रास होतो. रक्तातील संधिवातात मनगटातील हाडांची झिज झाल्यामुळे नसांच्या आवरनांना सुज आल्यामुळे सांध्यावर सुज आल्यामुळे मेडियन नर्व्ह दबून जाते व त्रासाला सुरुवात होते.  

➤गाऊटी संधिवातात शरीरातील ''युरिक ऍसिड'' चे प्रमाण वाढते. वाढलेले युरिक ऍसिड चे कण एकत्र येऊन सांध्यात जमा होतात. हे युरिक ऍसिड चे कण किंवा क्रिस्टल्स कार्पल टनल मध्ये जमा होतात. परिणाम मेडियन नर्व्ह वर दाब निर्माण होतो.बधिरपणा मुंग्या येण्यास सुरवात होते.

➤IT/BPO आणि कॉलेज युवक युवतींमध्ये व्यायाम न करता प्रोटिन युक्त पदार्थ जास्त खाण्याचे प्रमाण अधिक आहे. अशा जास्त प्रोटिनयुक्त आहारामुळे शरीरातील युरिक ऍसिड वाढते. परिणाम ''गाऊटी टॉफीज'' किंवा क्रिस्टलस टनेल मध्ये जमा झाल्यामुळे कार्पल टनल सिंड्रोमचा काही रुग्णांना त्रास होतो. 

➤हायपर कॅलसिमिया --रक्तातील कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असणाऱ्या रुग्णास कॅल्शिअम --कार्पल टनलमध्ये जमा झाल्यामुळे सुद्धा-- कार्पल टनल सिंड्रोमचा त्रास होतो. 

➤मानेतील चकती सरकल्यामुळे (PID) किंवा सर्व्हाकल रिब (मानेतील ज्यादा बरगडी) मुळे येणाऱ्या मुंग्या व बधिरपणा व कार्पल टनल सिंड्रोम यात बराच मुलभूत फरक आहे. दोन्ही आजार सारखे नाहीत. 

कार्पल टनल सिंड्रोमची काही वैशिष्ट्ये :-

१) अ) त्रास नसणाऱ्या रुग्णांच्या दंडास B.P कप लाऊन पारा २२० mmHgपर्यंत चढवल्यास हातात मुंग्या येण्यास २-३ मिनिटे लागतात. 

ब ) कार्पल टनल सिंड्रोम असणाऱ्या रुग्णांच्या दंडास B.P कप बांधून पारा  २२० mmHg पर्यंत चढवल्यास सेकंदातच हातात मुंग्या येण्यास सुरवात होते. 




२) हात कोपरातून उभा ठेऊन पंजा मनगटातून खाली वाकवल्यास (Flexion) मेडियन नर्व्ह वर दाब वाढून पंजात व बोटात मुंग्या येतात. सर्वसाधारण (Normal) रुग्णास  बराच वेळ लागतो पण  कार्पल टनल सिंड्रोमच्या रुग्णास साधारण १ मिनिटात मुंग्या व कळा येतात. 


३) मनगटावर (रबरी) हातोडीने किंवा बोटाने प्रहार केल्यास कार्पल टनल सिंड्रोमच्या रुग्णाच्या पंजात व बोटात मुंग्या येतात. सर्वसाधारण रुग्णांमध्ये येत नाहीत. 


थोडक्यात कार्पल टनल सिंड्रोमची कारणे :-

  1. संगणकाचा ८-१२ तास अतिवापर,(IT/BPO कर्मचारी /शासकीय व बँक कर्मचारी)
  2. मोबाईलचा अतिवापर टेक्स्ट टायपिंग /एस. एम .एस /गेम खेळण्यासाठी /शाळा कॉलेज युवक-युवती/ IT/BPO कर्मचारी 
  3. रक्तातील संधिवातामुळे आलेली सुज उदा. रुमेटॉइड अर्थराइटिस.(Rheumatoid Arthritis)
  4. मनगटात निर्माण होणाऱ्या गाठी उदा गॅंगलीऑन  ही एक साधी गाठ आहे सांध्याच्या किंवा नसेच्या (टेंडन ) च्या आवरणापासून तयार होते. त्यात जेली सारखे(Mucin) द्रव असते. 
  5. गोऊटी अर्थराइटीस /हायपर यूरेसिमिया 
  6. कॅल्शिअमचे रक्तातील जास्त प्रमाण 
  7. हार्मोनल इम्बॅलन्समुळे व इतर कारणांमुळे सुज येणारे आजार 
  8. काही महिला रुग्णांना गरोदरपणात किंवा प्रसुतिनंतर याचा त्रास होतो.  
  9. मनगटातील वेडी वाकडी (Malunited) जुळलेली हाडे 
  10. अति तीव्र स्वरूपाचा त्रास मनगटात हाड मोडल्यामुळे (#)व हाडे सरकल्यामुळे होतो /मेडियन नर्व्हच्या आवरणात रक्तस्त्राव झाल्यामुळे सुद्धा होतो. 
तपासण्या :-
  1. X-RAY
  2. Nerve Conduction Study (NCS)


         3. संधिवातासाठी रक्त तपासणी 

उपचार:-

कार्पल टनल सिंड्रोम हा एक INCIDIOUS DISEASE आहे. कारण तो हळूहळू वाढतो आणि हानिकारक परिणामात त्याचे रूपांतर होते. योग्य वेळी योग्य निदान केल्यास ऑपरेशन तसेच हानिकारक परिणाम जसे ताकद कमी होणे ,हात निकामी होणे टाळता येते.  

उपचाराचे प्रमुख २ भाग :- 
  1. ऑपरेशन विरहित 
  2. ऑपरेशन

  1. ऑपरेशन विरहित उपचार :-
अ ) संगणक व मोबाईलचा वापर टाळणे-- कमी करणे अथवा योग्य पद्धतीने करणे
ब )  जास्त त्रास होत असल्यास स्पीलींट(Splint) लावून १० ते १५ दिवस मनगटास विश्रांती देणे. 



क) त्रास कमी करण्यासाठी अस्थिरोगतज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने वेदनाशामक व नसांवर काम करणाऱ्या गोळ्या घयाव्यात. नसांची झीज भरुन काढणाऱ्या गोळ्या घ्याव्यात. संधिवातावर नियमित इलाज घ्यावेत. 
ड ) त्रास कमी झाल्यानंतर व प्रतिबंधात्मक उपायासाठी नियमित मनगटाचे व्यायाम करावेत.सतत काम करणे टाळावे. संगणकावर काम करत असतांना सुद्धा मध्ये ब्रेक घेऊन मनगटाचे व्यायाम करावेत.

व्यायाम :-



१)
२)


३) 

४)
५)
६)
७)



संगणक वापरण्याची योग्य पद्धत


इ ) जीवनशैलीत बदल केल्यास व नियमित व्यायाम केल्यास ऑपरेशन व हानिकारक परिणाम टाळता येतील. 

2) ऑपरेशन :- अति तीव्र स्वरूपाचा त्रास असल्यास 
उदाहरणार्थ 
  • कामाच्या हातातील  (Dominant Hand)ताकद कमी होत असल्यास 
  • भरपूर कळा / मुंग्या येत असल्यास 
  • हाड मागे सरकले असल्यास 
  • नसांच्यामध्ये रक्तस्त्राव झाला असल्यास 
  • गाऊटी क्रिस्टल काढण्यासाठी,कॅल्शिअमचे खडे काढण्यासाठी ,गॅंगलीऑन सारख्या गाठी काढण्यासाठी ऑपरेशन करावे लागते तर ऑपरेशन करुन मेडियन नर्व्ह मोकळी करावी लागते.  ऑपरेशननंतरही त्रास कमी होण्यास बराच उशीर लागतो. दोन ते सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो. 
नियमित व्यायाम,संगणक व मोबाईलचा वापर करत असतांना थोडी दक्षता बाळगल्यास हा आजाराचं तुम्हास होणार नाही .
आजार होण्याआधी टाळलेला बारा. 



डॉ.संजय कामत 
अस्थिरोगतज्ञ 
प्रमुख कामत हॉस्पिटल ,पुणे. 
९८२२४३७८८२/७२७६७२२२२९















Comments

  1. Very useful information to avoid suffering caused from such diseases

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कोपरदुखी/टेनिस एल्बो/गोल्फर्स एल्बो

VitB12 / B6 / फॉलिक ऍसिड गुणकारी जीवनसत्त्व

Vit D 'ड' जीवनसत्व गुणकारी जीवनसत्व